नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून, प्रधानमंत्र्यांच्या भेटीसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी देखील यावेळी उपस्थित असतील. या कार्यक्रमाला सुमारे चार ते पाच लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. प्रधानमंत्र्यांची भेट आणि या कराराचं स्वागत करण्यासाठी ऑल बोडो स्टुडंट्स युनियन या संघटनेनं काल एक बाईक रॅली काढली.

केंद्र सरकार, आसाम सरकार आणि आसाममधली बंदी घातलेला एनडीएफबी अर्थात नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड यांच्यात गेल्या महिन्यात 27 तारखेला त्रिपक्षीय करार झाला होता.

आसामधल्या सर्वात जास्त सदस्य असलेल्या जमातींपैकी एक असलेल्या बोडो जमातीला राजकीय आणि आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं हा करार केला होता. या अंतर्गत केंद्र आणि राज्य यांच्या समान योगदानानं पुढल्या तीन वर्षात 1500 कोटी रुपयांचा आर्थिक कार्यक्रम राबवला जाणार आहे.