भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या “खोटे बोल पण रेटून बोल” चा प्रचार जोमात सुरू आहे. भोसरी परिसरात पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था आल्याचा अपप्रचार करून मतदारांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. भोसरीमध्ये एक तरी नामांकित शैक्षणिक संस्था आली आहे काय? हे आता मतदारांनीच शोधून काढावे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग भोसरी विधानसभा मतदारसंघात हजारो घरांचा प्रकल्प साकारला जात असल्याचा भुलभुलैय्या निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात चिखली येथे गोरगरीबांना घरे देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पाचे काम दहा-अकरा वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण नाही. या प्रकल्पाकडे गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी साधे ढुंकूनही पाहिलेले नाही. हेच सत्ताधारी आता निवडणुकीमुळे वाटेल तशा खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहेत. अशा खोट्या प्रचाराला भोसरी मतदारसंघातील मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी केले आहे.
यासंदर्भात शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कि “भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या विरोधकांनी खोटे बोल पण रेटून बोलचा अपप्रचार सुरू केला आहे. न झालेली कामे सुद्धा झालीच आहेत अशा पद्धतीने नागरिकांना सांगितली जात आहेत. मतदारसंघातील गुंडगिरी, दादागिरी आण दहशतीवर पांघरून घालण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. विरोधकांनी मतदारसंघात कामे केली असती तर त्यांना एवढा गाजावाजा करण्याची गरजच भासली नसती. नागरिकांना मतदारसंघात किती विकासकामे झाली आहेत, हे सर्व माहिती असूनही विरोधक वाटेल ते सांगून चक्क या नागरिकांचीच फसवणूक करत आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत, असे रेटून सांगितले जात आहे. आता हा प्रचार खरा की खोटा हे मतदारसंघातील जनतेनेच विचार करण्याची गरज आहे. मतदारसंघात किती नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत, हे नागरिकांनीच ठरवावे. विरोधकांना किती खोट बोलावे याची सीमा राहिलेली नाही, हे यावरून सिद्ध होते. असा खोटा प्रचार करणाऱ्यांना या मतदारसंघातील जनतेने निवडणुकीत त्यांचा जागा दाखवून द्यावी. भोसरी मतदारसंघात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हजारो घरांचा प्रकल्प साकारला जात असल्याचे विरोधक सांगत आहेत. प्रत्यक्षात या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर वर्ष झाले तरी त्याचा नारळ सत्ताधाऱ्यांना फोडता आला नव्हता. त्यामागे आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे हा हेतू होता. मर्जीतील ठेकेदाराला कोट्यवधी रुपये जादा मोजून या प्रकल्पाचे काम देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे.
एकीकडे पंतप्रधान आवास योजनेत हजारो घरे उभारण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे चिखली येथे गोरगरीबांना घरे देण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे काम दहा-अकरा वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. या प्रकल्पासाठी पात्र नागरिकांची चक्क फसवणूक करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाकडे साधे ढुंकूनही पाहिलेले नाही. गोरगरीबांच्याच एका प्रकल्पासाठी दहा-बारा वर्षे लागत असतील, तर पंतप्रधान आवास योजनेचे काय होईल? हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे जनतेने आता मतदारसंघात सुरू असलेल्या खोटे बोल पण रेटून बोलच्या सत्ताधाऱ्यांचा प्रचाराला बळी पडू नये. निवडणुकीत असा खोटा प्रचार करून सत्ताधारी पुन्हा निवडून आल्यास या मतदारसंघाची काय अवस्था होईल, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन धनंजय भालेकर यांनी केले आहे.”