पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ची घोषणा देऊन या देशातील सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला. या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्रउभारणीतील कार्याचे स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुणे रेल्वेस्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी प्रशासनातील अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन केले.