मुंबई (वृत्तसंस्था) : मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या सोमवारपासून राज्यातली हॉटेलं आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारनं आज जारी केली. यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतर, लक्षण नसतील अशाच ग्राहकांना हॉटेलांमधे प्रवेश देता येणार आहे.
याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून, जे ग्राहक विना मास्क असतील त्यांना प्रवेश दिला जाऊ नये असं या नियमावलीत म्हटलं आहे. परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक असणार आहे.
कोरोनाला प्रतिबंध करावा म्हणून शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा, रोख रक्कम हाताळताना पुरेशी काळजी घ्यावी असंही या नियमावलीत म्हटलं आहे. प्रसाधनगृह तसंच ग्राहकांद्वारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा, फर्नीचर सतत स्वच्छ करावं.
कॅश काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यानं संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी काचेच्या भिंतीसारख्या रोधकांचा वापर करावा असं या नियमावलीत म्हटलं आहे. ग्राहकांना केवळ शिजवलेले खाद्यपदार्थ द्यावेत, कच्चे पदार्थ देणं टाळावं असं या नियमावलीत सूचवलं आहे.
हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधले सर्व सीसीटीव्ही कार्यरत असतील याची खबरदारी घ्यावी, हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधे प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत असंही या नियमावलीत म्हटलं आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्याच्या दृष्टीनं आलेल्या ग्राहकांचा तपशील आरोग्य तंत्रणेला देण्याबाबत ग्राहकांची संमती घ्यावी असं या नियमावलीत म्हटलं आहे. याशिवाय केंद्र तसंच हॉटेलं आणि रेस्टॉरंटसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं जारी केलेले नियम, तसंच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाच्या नियमांचं पालन करणंही बंधनकारक असणार आहे.