नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींना उपवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्या व्यक्तींनी रमजानच्या काळात उपवास करू नये. इतर व्यक्ती मात्र उपवास करू शकतात संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेने यासंदर्भात फतवा काढला आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनीही उपवास केला नाही तरी चालेल, असंही परिषदेनं म्हटलं आहे. पवित्र कुराणात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हे फतवे काढल्याची माहिती शेख अब्दुल्ला बीन बयाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फतवा परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत देण्यात आली.
सध्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी घरीच स्वतंत्रपणे प्रार्थना करावी. शुक्रवारीही एकत्र येऊन प्रार्थना करू नये. त्याऐवजी दुहरची प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ईदच्या दिवशीही कुठल्याही प्रवचनाशिवाय प्रार्थना करावी असं आवाहन परिषदेनं केलं आहे.
या दरम्यान गरीबांना अधिकाधिक मदत करावी. जकातचा निधी देशातल्या देशात खर्च करावा असं परिषदेनं म्हटलं आहे. या काळात प्रशासनानं दिलेल्या आदेशांचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नका असंही संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेने म्हटलं आहे.