नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या रुग्णांची संख्या दुप्पट व्हायला आता अधिक वेळ लागतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही दिलासादायक बाब समोर आणली आहे. संचारबंदीपूर्वी सुमारे साडेतीन दिवसात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण दुप्पट होत होते. आता सुमारे साडेसात दिवसानंतर रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज दिली.
देशातल्या १८ राज्यांमध्ये रुग्ण दुप्पट होण्यासाठी साडेसात दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. केरळ आणि ओडिशामध्ये तर सुमारे महिनाभरानंतर रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचेही ते म्हणाले.
देशातल्या सुमारे ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची कुठलीही लक्षणं आढळून येत नाहीत किंवा फार कमी लक्षणं आढळून येतात. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
कोरोना विषाणूचा संसर्ग गंभीर असलेल्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये केंद्र सरकारचे आणखी अधिकारी येऊन पडताळणी करणार आहे. याठिकाणांसाठी केंद्र सरकारमधल्या विविध मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचे ६ समूह तयार करण्यात आले आहेत. हे अधिकारी मुंबई, पुण्यासारख्या शहरांना लवकरच भेट देणार आहेत. याठिकाणी प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करून आणखी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याचे मार्गदर्शन या अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे.
रॅपिड टेस्टच्या किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी देशाच्या काही भागातून आल्या होत्या. मात्र या किट्स अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मंजुरी दिलेल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे. या किट्स वापरण्यासाठी २० डिग्री सेल्सियस पेक्षा कमी तपमान गरजेचे आहे. काही ठिकाणी या दिशानिर्देशांचं उल्लंघन घाल्यामुळे परिणाम चुकीचे आले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.