नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने अजिबात गाफिल राहू नका. अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे. ही लढाई आत्ता तर कुठे सुरु झाली आहे. त्यामुळे पुढील ३ महिने आपल्याला गाफील न राहता काम करावे लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आजपासून उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तर त्यासाठी कामाच्या ठिकाणीच कामगारांची निवासाची व्यवस्था करणे गरजेचे आहे, कामगारांची वाहतूक उद्योगांना करता येणार नाही. यासाठी एमआयडीसीच्या वेबसाइटवर नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची छाननी करुनच परवानगी देण्याचे आदेश त्यांनी दिले.
खरीप हंगामाची कामे, वृक्षारोपण, तेंदूपत्ता, जंगलातील लाकूड विषयक, मस्त्यव्यवसाय, मनरेगा अशी व इतर शेती विषयक कामे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतात. ती पुरेशी सामाजिक अंतराची काळजी घेऊन सुरु राहिली पाहिजे असेही ते म्हणाले.
पुण्या-मुंबईसह इतर शहरांमध्ये पाणी साचणे, पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामं लवकर संपविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेताना इतर आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातले खासगी डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळतील, वेळेवर लसीकरण, बाळंतपण, डायलेसीस, महत्वाच्या शस्त्रक्रिया होतील याची खात्री करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.