नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर, ग्रामविकास विभागातल्या विविध पदांच्या भरतीची प्रसिद्ध झालेली जाहिरात खोटी असल्याची माहिती, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं दिली आहे. या खोट्या जाहिरातीला कुणीही बळी पडू नये असं आवाहन, ग्रामविकास विभागानं केलं आहे.
या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदं भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागात कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक-ई-ग्रामपंचायत असं कोणतेही पद अस्तित्वात नाही, असा खुलासाही ग्रामविकास विभागानं केला आहे.
या संकेतस्थळावर कॉल केल्यानंतर, महाराष्ट्र शासनासाठी काम करतो असं सांगून अनेकांना फसवलं गेलय, या जाहिरातीच्या माध्यमातून, राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्टं होत आहे, असंही ग्रामविकास विभागानं म्हटलं आहे. खोटी जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे.