पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : म्हाडामार्फत सन 1988 मध्ये सोलापुरातील जुळे सोलापूर भाग-2 येथे विडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांच्या व्याजाची आकारणी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ सुमारे 625 विडी कामगारांना होणार आहे. याशिवाय यापूर्वी ज्या विडी कामगारांनी प्रामाणिकपणे मुद्दल आणि व्याज भरले अशा विडी कामगारांनाही व्याज माफीचा लाभ देण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्याचे तत्कालीन गृहनिर्माणमंत्री आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.
म्हाडामार्फत सन 1988 मध्ये सोलापुरातील जुळे सोलापूर भाग-2 येथे विडी कामगारांसाठी 3 हजार 38 घरकुले बांधण्यात आली होती. नाममात्र किमतीवर विडी कामगारांना ही घरकुले देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव काही विडी कामगार घरकुलाची किंमत भरु शकले नव्हते. अशा विडी कामगारांना घरकुलाची किंमत व्याजासह भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण दरम्यानच्या काळात व्याजाची रक्कमही वाढत गेल्याने अनेक विडी कामगारांना ती रक्कम भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे व्याज माफ करुन फक्त मूळ रक्कम भरुन घेण्यात यावी, अशी मागणी होत होती.
त्याअनुषंगाने पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांनी गृहनिर्माणमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत हा विषय मांडून व्याजाची रक्कम माफ करावी, अशी मागणी केली होती. नंतर म्हाडा प्राधिकरणाच्या 282 व्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देऊन व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ज्यांनी यापूर्वी प्रमाणिकपणे व्याज भरले त्यांनाही प्रोत्साहन म्हणून त्यांची व्याजाची रक्कम परत करण्याचा निर्णय प्राधिकरणातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गोरगरीब विडी कामगारांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या हक्काच्या घरात ते आनंदाने राहू शकतील, अशी भावना पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
या घरकुल योजनेतील 625 विडी कामगार हे थकबाकीदार होते. त्यापैकी 268 विडी कामगारांनी यापूर्वीच्या विविध अभय योजनांचा लाभ घेत थकित रकमेचा भरणा केला होता. त्यानंतर साधारण 357 विडी कामगार हे थकित होते. त्यांच्याकडून मूळ मुद्दल 73 लाख 13 हजार रुपये तर व्याजाची रक्कम 1 कोटी 99 लाख 66 हजार रुपये वसूल करणे बाकी होते. ही व्याजाची रक्कम मूळ मुद्दलापेक्षा जास्त होती. आता पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारामुळे ही व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयामुळे विडी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय यापूर्वी ज्या विडी कामगारांनी प्रामाणिकपणे मुद्दल आणि व्याज भरले अशा विडी कामगारांनाही व्याज माफीचा लाभ देण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. असे केल्यास यापुढेसुद्धा प्रामाणिकपणे आणि नियमित व्याज भरणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळू शकेल, अशी भावना म्हाडा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.