मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या  प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती विमुक्त जाती भटक्या जमाती, इमाव व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

डॉ. कुटे म्हणाले,  ‘बार्टी’ तसेच ‘सारथी’या दोन्ही संस्थांमार्फत त्या-त्या लक्षित घटकांसाठी अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या-त्या घटकांच्या युवक युवतींचा विविध माध्यमातून विकास घडविला जात आहे. त्याचप्रकारे, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठीसुद्धा विविध उपक्रम अंमलात यावे, असे शासनाने ठरविले आहे.

या प्रवर्गासाठी सारथी संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यासंदर्भात सर्वंकष अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती, इमाव, विमाप्र कल्याण, कामगारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल. ही समिती एक महिन्याच्या कालावधीत शासनास अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे शासनाकडून योग्य ती मान्यता मिळाल्यानंतर प्रस्तावित संस्था कार्यान्वित होऊन विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बहुजन समाजाचे व त्यातील युवक-युवतींचे मोठे हित साधले जाईल, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.