नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आज सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या १ गडी बाद ३९ धावांवर पुढे सुरु केला. मात्र भारताचा संपूर्ण संघ केवळ १८७ धावा करून माघारी परतला. सलामीवीर शुभमन गील आणि कर्णधार विराट कोहली यांच्याशिवाय भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही.

गील यानं ५० तर कोहलीनं ७२ धावा केल्या. इग्लंडच्या वतीनं जॅक लीच यानं ४, जेम्स अँडरसन यानं ३ तर जोफ्रा आर्चर, डॉमिनिक बेस आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मालिकेतला दुसरा सामन्या येत्या १३ फेब्रुवारीपासून चेन्नई इथंच खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्टेडियमधे ५० टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे.