मुंबई (वृत्तसंस्था) : देशात असलेल्या एकूण अॅक्टीव्ह रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचं पथक शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलं. त्यांनी मुंबईतलं शीव रुग्णालय, तसंच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर इथं भेटी दिल्या. राज्यातल्या एकूण अॅक्टीव्ह रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून या भागात नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याचं पथकानं सांगितलं. विदर्भाच्या ग्रामीण भागात विशेषतः अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पॉझीटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचं निरीक्षण पथकानं नोंदवलं आहे.

या भागात रुग्णसंख्येचं प्रमाण का वाढत आहे याचा गांभिर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातल्या यंत्रणा अधिक सतर्क करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. पथकानं ज्या भागात पॉझीव्हीटी दर जास्त असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे तिथं तो कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करू, असं ते म्हणाले. या भागातल्या रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.