मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ पूर्णांक ७३ शतांश टक्के झालं आहे. काल राज्यात ३ हजार ४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार २१६ नवीन रुग्ण आढळले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे. काल राज्यात २ हजार २१६ नवीन रुग्ण आढळले.
आतापर्यंत राज्यात २० लाख ४६ हजार २८७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत १९ लाख ५८ हजार ९७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एकूण ५१ हजार ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा कोविड मृत्यू दर २ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. पुणे, कोल्हापूर, औरंगाबादसह बहुतांश जिल्ह्यांमधे काल एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. सध्या राज्यात ३४ हजार ७२०रुग्ण उपचार घेत आहेत.