मुंबई : “भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातल्या कामगारांना हक्कांची जाणीव आणि ते मिळवण्यासाठी लढण्याचे बळ दिले. कामगारांच्या श्रमांना मोल आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. साप्ताहिक रजा, वैद्यकीय रजेसारखे हक्क कामगारांना मिळवून दिले. अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, वेठबिगारीच्या जोखडातून कामगारांना बाहेर काढणारे ते कृतीशील नेते होते. कामगार हक्काचा लढा लढताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांना पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य आणि विचार राज्याच्या सामाजिक, कामगार चळवळीला सदैव प्रेरणा देतील. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.