प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना करण्यात येणाऱ्या मोफत सिलिंडरचे वितरण जलदगतीने करण्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे तेल विपणन कंपनी अधिकाऱ्यांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना करण्यात येणाऱ्या मोफत सिलिंडरचे वितरण जलदगतीने करण्यासाठी परिश्रमपूर्वक आणि पद्धतशीरपणे कार्य करण्याचे आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एलपीजी सिलिंडर पुरवठा साखळीतील सर्व हितसंबंधितांना केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत पुढील 3 महिन्यांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील 8 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी 3 विनामूल्य सिलिंडर मिळण्यास पात्र आहेत.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत शासनाने गरिबांसाठी एक पॅकेज जाहीर केले असुन विनामूल्य गॅस पुरविणे हा त्यातील महत्वाचा घटक आहे असे धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरातील तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी) जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसमवेत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. एप्रिलच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांत सुमारे 40% लाभार्थ्यांना त्यांचे सिलिंडर मिळाले, यावरून निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी सिलेंडर नोंदणी आणि त्याचे वितरण यात मोठी वाढ होणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. सर्वोत्तम पद्धती अवलंबून निर्धारित लक्ष्य योजनेनुसार काम करावे आणि त्यादृष्टीने प्रयत्न वाढवावेत असे आवाहन त्यांनी जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना (डीएनओना) केले. घरपोच सिलिंडर वितरणात कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच अतिरिक्त शुल्क आकारण्याची कोणतीही तक्रार येऊ नये,असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी सर्वोच्च प्राधान्य आहेत, परंतु अन्य नियमित ग्राहकांच्या पुरवठ्यावर हीपरिणाम व्हायला नको. जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्यविषयक काळजी घ्यावी, लॉकडाऊनदरम्यान गृह मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करावे आणि लोकांना आरोग्यसेतू अॅपबद्दल जागरूक करावे असे आवाहन प्रधान यांनी केले.
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास मदत करण्यासाठी आणि सिलिंडर नोंदणी करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब केला आहे अशी माहिती जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. लोकांना या योजनेबद्दल आणि त्याबद्दलच्या प्रक्रियेबद्दल जागरूक करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी काहीजण सुयोग्य वेळेचा अवलंब करीत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नात किराणा दुकानदार, जिल्हा प्रशासनाची मदत घेत आहेत. त्यांच्यापैकी बर्याचजणांनी अशी माहिती दिली की त्यांनी पंतप्रधान सहाय्य निधीसाठी एकत्रितपणे हातभार लावला आहे, तसेच आरोग्यसेतू अॅपचा प्रचारही ते करीत आहेत.
बिहारमधील सुपौल येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एलपीजी सिलिंडरचे वितरण करणाऱ्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल प्रधान यांनी शोक व्यक्त केला. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बैठक सुरू होण्यापूर्वी एक मिनिट शांतता पाळली गेली. त्या दिवंगत मुलाच्या कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेण्याच्या आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.