नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला असून आर्थिक व्यवहार ठप्प असल्यानं बेरोजगारी आणखी वाढण्याची शक्यता आहे, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान साडे सात हजार रुपये आणि विस्थापित कामगारांना भोजन निवास आणि आर्थिक सुरक्षा मिळणं आवश्यक असल्याचं, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
त्या आज काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत व्हीडीओ कॉन्फरन्समधे त्या बोलत होत्या. कोरोना विषाणू संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याची टीका गांधी यांनी केली. कोविड १९ वर चाचणी, मागोवा, आणि विलगीकरणाला पर्याय नाही, याकडे काँग्रेस वारंवार प्रधानमंत्र्यांचं लक्ष वेधत आहे. मात्र, अजूनही या चाचणी साहित्य संचाचा तुटवडा भासत असून, प्राप्त होणाऱ्या चाचणी संचांची गुणवत्ताही सुमार दर्जाची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले होते. कोविड – १९ चा सामना करण्यासाठी केलेलं लॉकडाउन यशस्वी ठरलं आहे का ? याचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करावा असं, मनमोहन सिंग यावेळी म्हणाले.