नवी दिल्ली : भारतीय खलाशांच्या कामावर रुजू आणि काम बंद करण्याविषयीच्या म्हणजेच साईन- ऑन/साईन-ऑफ विषयक प्रमाणित कार्यवाही प्रक्रिया SOP आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली. त्यानंतर पहिल्यांदाच जर्मन जहाजावर असलेले 145 भारतीय खलाशी आज मुंबई बंदरावर उतरले.
मुंबई पोर्ट ट्रस्टने या खलाशांच्या उतरण्याची व्यवस्था केली, मात्र त्याआधी या सर्वांची त्रीस्तरीय कठोर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. गोदीवरच खलाशांच्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. पोर्टचे आरोग्य अधिकारी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या डॉक्टरांनी त्यांची पहिल्या टप्प्यात तपासणी केली. दुसऱ्या टप्प्यात मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करुन त्यांच्या हातांवर गृह-विलगीकरणाचे शिक्के मारले. तर तिसऱ्या महत्वाच्या टप्प्यात, या सर्वांचे स्वाब नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले.
त्यांनतर अबकारी, इमिग्रेशन, सुरक्षा आणि बंदर तपासणी अशा सगळ्या सामान्य प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. यावेळी तपासणी अधिकाऱ्यांनी PPE सूट घालत सामाजिक नियमांचे पालन केले. या सर्व खलाशांच्या चाचण्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना मुंबईतच गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.