नवी दिल्ली : कोविड१९ च्या महामारीनं जगासमोर नवनवी आव्हानं उभी केली असून ‘दोन हातांचं अंतर’ हाच या लढ्याचा महामंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंचायतराज दिनानिमित्त आज त्यांनी देशभरातल्या सरपंचांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड१९ च्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी सुरक्षित अंतराचं पालन ग्रामीण भागातल्या जनतेने उत्तमरीत्या केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. जनतेच्या सहभागामुळेच जग हादरवून टाकणाऱ्या या संकटाला तोंड देणं भारताला शक्य झालं असून भारताच्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक होत आहे असं सांगून मोदी म्हणाले की पंचायत राज संस्थांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणं आवश्यक आहे, हा या महामारीनं दिलेला धडा आहे.

पंचायतराज दिनानिमित्त ‘ई-ग्राम-स्वराज पोर्टल’चं आणि मोबाईलचं तसंच जमिनीच्या मालकीहक्क विषयक सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या “स्वामित्व” योजनेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. या साधनांमुळे विकासकामांमधे पारदर्शकता राहील असं ते म्हणाले.

देशाच्या विविध भागातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी तसंच सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी करत असलेले उपाय जाणून घेतले. महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातल्या चाकण जवळच्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांनी संवादात भाग घेतला. सरकारच्या योजना तसंच कोविड१९ विरुद्धच्या लढ्याबद्दल जनजागृती करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी सरपंचांना केलं. प्रधानमंत्री परवा रविवारी २६ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६४ वा भाग असेल.