नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात देशभरात विविध सण संयमाने साजरे केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते. प्रधानमंत्र्यांनी जनतेला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. जैनांचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांचं तसंच स्वामी बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं.
कोरोनाच्या संकट काळातच रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. यावेळी पूर्वीपेक्षा जास्त प्रार्थना करू, ईद येईपर्यत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आपण पहिल्यासारख्याच उत्साहानं ईद साजरी करू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशातल्या कोरोनाविरोधातल्या लढ्याचं खरं नेतृत्व देशातली जनता करत असल्याचं म्हणत, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जनता करत असलेल्या सहकार्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. आघाडीवर लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतच, सफाई कामगार, पोलीस, मजूर, अन्नपुरवठा करणारे शेतकरी आणि गरीबांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या व्यक्ती आणि संस्था, बँकेतले कर्मचारी, प्रशासन तसंच या सगळ्यांना सहकार्य करणारे नागरिक यांच्या योगदानाचा उल्लेख करत, मोदी यांनी त्यांचे आभारही मानले.
राज्याराज्यांमधली सरकारं आणि तिथली स्थानिक प्रशासनं कोविड१९ चा प्रादुर्भाव रोखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हणत मोदी यांनी त्यांचं कौतुकही केलं.
आपल्यापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पोचला नसेल तर गाफील न राहता सावध राहिलं पाहीजे, हेच जगभरातल्या अनुभवातून दिसतं, त्यामुळे सुरक्षित शारिरिक अंतर आणि मास्कचा वापर कायम ठेवण्याचा आग्रह त्यांनी जनतेला केला.
भारतीयांचं मनोधैर्य आणि एकजूट याप्रमाणेच पारंपरिक वैद्यक ज्ञान साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरत असल्याचं ते म्हणाले. या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भारताचं आयुर्वेद आणि योगाचं महत्व अधोरेखित झाल्याचं ते म्हणाले. यापुढे युवा पीढीनं वैज्ञानिक दृष्टीकोनातून भारतीय आयुर्वेदाचं महत्व जगासमोर मांडावं असं आवाहन त्यांनी केलं.
देशातल्या कोणालाही या लढ्यात काहीएक योगदान द्यावसं वाटत असेल, त्यांच्यासाठी कोविड्सवॉरिअर्स डॉट. जी.ओ.व्ही डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन मंच उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, एनसीसी आणि एनएसएसचे सहकारी तसंच विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांसह आत्तापर्यंत सव्वाकोटी लोक या पोर्टलवर जोडले गेले असल्याचंही त्यांनी सांगितलं.