नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणाली द्वारे अंदमान निकोबार येथील २ हजार ३०० किलोमिटर लांबीच्या समुद्राखालून टाकलेल्या केवलचा अर्थात ओएफटीचा लोकार्पण सोहळा नुकताच केला. ही केबल चेन्नईला अंदमानातील आठ प्रमुख बेटांसोबत जोडणार आहे. यासाठी १ हजार २२४ कोटी रुपये खर्च आला आहे.

अंदमान निकोबारसाठी आजचा दिवस हा सौभाग्याचा आहे.  जितका प्रकल्प मोठा, तितकी अव्हानं जास्त असतात मात्र सगळे अडथळे पार करत अगदी कोरोनासुद्धा या कामाला थोपवू शकला नाही. ज्या चमूनं या कामासाठी आपलं मोठं योगदान दिलं त्यांचं पंतप्रधानांनी कौतूक केलं.

अंदमान निकोबार आता डिजिटल होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे असंही ते म्हणाले. या प्रकल्पामुळं अनेक वर्षांच्या आपल्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे. हा प्रकल्प म्हणजे इझ ऑफ लिव्हिंगचा एक भाग आहे. यामुळे जलवाहतूक, व्यापार याला चालना मिळेल.

देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत आणि प्रत्येक क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा पोहचल्या पाहिजेत हे आपलं स्वप्न आहे, आजच्या प्रकल्पामुळे ते साकार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दोन वर्षांच्या विक्रमी काळात हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या केबलमुळे या बेटांवरील लोकांना उच्च गतीने, विश्वासार्ह इंटरनेट सुविधा मिळेल.

राजधानी पोर्ट ब्लेयर, स्वराज दीप, लिटिल अंदमान, कार निकोबार, कामोर्ता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या बेटांचा त्यात समावेश आहे. भविष्यात ५ जी सेवा देखील याद्वारे देता येतील सध्या या बेटांना प्रति सेकंद ४०० गिगाबाईट्सचा डाटा स्पीड मिळू शकणार आहे असं बीएसएनएलचे चेन्नई इथले मुख्य महाव्यवस्थापक मुनिंद्रनाथ यांनी सांगितलं.