नवी दिल्ली : भारत-कॅनडा आयसी-ईम्पॅक्टस वार्षिक संशोधन परिषदेत सध्याचे आंतरराष्ट्रीय संबंध, विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी सामायिक करणे आणि सरकार आणि संस्थांमध्ये नवीन सहकार्यासाठी प्रोत्साहन देणे या घटकांना मजबूती देऊन दोन्ही देशांदरम्यान सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासंबंधी चर्चा झाली.
भारत-कॅनडा विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्व विशद करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रो. आशुतोष शर्मा म्हणाले, “दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या पातळीवर नेण्यासाठीच्या पद्धतींचा शोध घेतला पाहिजे. विज्ञान क्षेत्रात महिलांनी केलेले उत्तम कार्य, तंत्रज्ञान उपयोजन, विज्ञानातील वैविध्य आणि शाळांमधील स्टेम (STEM) या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण केली जाऊ शकते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम सायन्सेस आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये नवीन संशोधन केले पाहिजे”.
परिषदेदरम्यान त्यांनी भारताच्या नवीन विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावोन्मेश (STI) योजनेविषयीची माहिती दिली, आणि महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधांचे महत्त्व अधोरेखीत केले. अशा संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी कॅनडा काही सांगू इच्छित असेल, तर त्यांचे स्वागत आहे, असे ते म्हणाले.
भारत-कॅनडा सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह मल्टि डिसिप्लिप्लिनरी पार्टनरशिप टू एक्सीलरेट कम्युनिटी ट्रान्सफॉर्मेशन अँड सस्टेनेबिलिटी (IC-IMPACTS) यांनी 6 ऑगस्ट 2020 रोजी परिषदेचे आयोजन केले होते.
वैज्ञानिक संचालक आणि आयसी-ईम्पॅक्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. नेमी बॅन्थिया म्हणाले की, आयसी-ईम्पॅक्टने 1,129 संशोधन प्रबंध प्रसिद्ध केले आहेत, 63 द्वीपक्षीय संशोधन प्रकल्प, 24 तंत्रज्ञान उपयोजन, 352 भागिदाऱ्या आणि 29 पेटंटस आणि तंत्रज्ञान प्रकटीकरण साध्य केले आहे. ते म्हणाले की, आयसी-ईम्पॅकट अंतर्गत 200 उच्च शिक्षित भारतीय विद्यार्थी, यात बहुतांश मास्टर्स, पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक्टरेट यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या भागीदारीअंतर्गत 7 स्टार्ट-अप्सची निर्मिती आणि अनेक तरुण पदवीधारांना नोकरी मिळाली आहे.
आयसी-ईम्पॅक्ट अंतर्गत मुख्यत्वे पर्यावरणपूरक इमारती आणि स्मार्ट सिटीज, आगीदरम्यान इमारतीतील लोकांचे जीव वाचवणे, एकात्मिक जल व्यवस्थापन आणि सुरक्षित आणि शाश्वत पायाभूत सुविधा आणि पाण्यापासून तसेच संसर्गजन्य रोगांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या यावर संशोधन केले जाते.