नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं लॉकडाऊन बाबतचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यावर देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या आपल्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याचा प्रयत्न काही राज्यं करत आहेत. गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं परस्परांच्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात बाहेरच्या राज्यात अडकून पडलेल्या सुमारे सव्वा दोन हजार मजुरांना परत आणण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं उद्दिष्ट आहे. हरियाणातून ८२ बसेस मधून काही मजूर राज्यात परतले असून आज आणखी ११ हजार मजुरांना राज्यात आणलं जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली.
मध्यप्रदेश सरकारनं देखील उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान इथं अडकून पडलेल्या आपल्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा केल्याचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी म्हटलं आहे.
राजस्थान सरकारनं देखील आपल्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याची तसंच अन्य राज्यातल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.