नागपूर/नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट आले असतांना लॉकडाऊनच्या काळामध्ये चिंताग्रस्त असलेले, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच विद्यार्थी अशा 1.5 कोटी समाज घटकांसोबत  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी लोक-संवाद साधला आहे. या दरम्यान त्यांनी या सर्व समाज घटकांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच उद्योजकांना लॉकडाऊन नंतर उद्योग क्षेत्रामध्ये उभारी घेण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिल. त्यांच्या प्रश्नांचे तसेच समस्यांचे वाणिज्य विभाग, वित्त विभाग, रेल्वे विभाग तसेच इतर संबंधित विभागांच्या मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार आणि चर्चा करुन   निराकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी या संकट समयी या सर्व समाज घटकांना मनोबल न खचू देता या आपत्तीचे रूपांतर संधीमध्ये करण्याचे आवाहन केले आहे.

 

देशात होणारी आयात कमी करून निर्यातीला वृद्धिंगत करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते संपूर्ण सहकार्य उद्योजकांना करेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी या संवादादरम्यान दिली. मुंबई-पुणे, गुडगाव अशा विकसित शहरांशिवाय इतरही शहरांमध्ये उद्योग वाढीला चालना मिळावी ज्यामध्ये कृषी आधारित उद्योगांचा समावेश असावा जेणेकरून स्थानिक युवकांना रोजगार मिळेल असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.

गेल्या दहा दिवसांमध्ये विविध व्यावसायिक संघटना, पत्रकार संघ, उद्योजक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून गडकरींनी संवाद साधला तसेच त्यांच्याकडून प्राप्त सूचना व प्रतिसाद संबंधित विभागांना त्यांनी कार्यवाहीसाठी पाठविले आहेत .यामध्ये  असोचॅम, फिक्की, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स, एआयपीएमए, भारतीय शिक्षण मंडळ ,यंग प्रेसिडेंट ऑर्गनायझेशन ,महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, सीईओ  क्लब ऑफ इंडिया, भारत चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई मुंबई या संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून संवाद साधला. यामध्ये इंग्लड, अमेरिका तसेच अरब देशातील नागरिकांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या संवादाच्याच श्रुंखलेमध्ये आज 26 एप्रिल रविवार रोजी त्यांनी विदेशातील विद्यार्थी आणि विद्वानांशी संवाद साधला . यामध्ये युके, कॅनड, सिंगापूरर, ऑस्ट्रेलिया स्थित 43 नामांकित विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभाग घेतला.