मुंबई : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा एकदा त्या संपन्न वारशानुसार अनुकरण करण्याची गरज आहे. कृषी, विज्ञान क्षेत्रात पुन्हा भरारी घेऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या पिढीने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी कृषि पदवीधरांनी दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार याचबरोबर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रकाश गजभिये, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनिता पाटील, डॉ.पंकजकुमार महाले, दत्तात्रय पानसरे, विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव पी.टी. सुर्यवंशी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपल्या भारताचा इतिहास हा खूप समृद्ध आहे. भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद यांनी जगात भारताचा गौरव वाढविला. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. योगाची संकल्पना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमुल्य अशी भेट आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजून पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपूर्ण असे संशोधन करावे लागेल. हा देश शेतकऱ्यांचा आणि कृषि पदवीधरांचा आहे. कृषि पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ५२ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३०८ विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व ४७०७ विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण ५०६७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. सन २०१८-१९ मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेल्या मोहीनी अशोक जगताप, बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेल्या गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे आठ वाण, एक कृषि यंत्र व औजारे आणि एकूण ४ तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकऱ्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांचे 263 वाण, 36 कृषि यंत्रे व अवजारे आणि 1518 तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत अद्ययावत कृषि हवामान व जल व्यवस्थापन हा रु. 19.90 कोटीचा प्रकल्प सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीकरीता मंजूर केलेला असून त्या अंतर्गत पदव्युत्तर आचार्य पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पदवीप्रदान समारंभापूर्वी विद्यापीठात आगमन झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट देऊन विविध बाबींची माहिती घेतली.
दरम्यान, सकाळी मुंबईहून कृषी विद्यापीठाच्या हेलीपॅडवर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी त्यांचे स्वागत केले.
समारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, माजी कुलगुरू डॉ.किसनराव लवांडे, डॉ.वेंकट मायंदे, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कृषि संचालक कैलास कोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी भूषण सुरसिंग पवार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बापुसाहेब भाकरे आणि डॉ.आनंद सोळंके यांनी केले.