नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार देऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘पोषण अभियान’ राबविण्यात येत आहे. देशातील ३७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या अभियानांतर्गत गेल्या अडीच वर्षात  एकूण ४ हजार २२३ कोटी ९० लाख ३९ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्राने राज्यांना वितरीत केलेल्या निधीमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत ९५० कोटींनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्राला चालू आर्थिक वर्षात ३३० कोटी  

महाराष्ट्राला पोषण अभियानांतर्गत चालू आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान आतापर्यंत ३३० कोटी ६१ लाख ४७ हजार रूपयांचा निधी वितरीत झाला आहे. राज्याला वर्ष २०१७-१८ आणि २०१८-१९ या मागील दोन आर्थिक वर्षात एकूण २३५ कोटी ६१ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.    

वर्ष २०१७-१८ ते २०१८-१९ या मागील दोन आर्थिक वर्षात देशातील ३७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या पोषण अभियानांतर्गत ३ हजार १४० कोटी ४७ लाख ९५ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला.

तर चालू आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान आतापर्यंत १ हजार ८३ कोटी ४२ लाख ४४ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.