नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून त्यांचे विलगीकरण करायचे आहे, यासंदर्भात धोरण ठरविण्याविषयी आज चर्चा झाली.
तसंच लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनविण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचे ते म्हणाले.
आगामी काळात लाल, केशरी आणि हरित क्षेत्र निहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील वगैरे निर्णय राज्यांनी घ्यावे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेउ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका, असंही प्रधानमंत्री म्हणाले.