मुंबई : देशात काल आणखी 1 हजार 897कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा 31 हजार 332 झाला आहे. काल या आजारानं 73 जणांचा मृत्यू झाला. कोविड 19 मुळे देशात आतापर्यंत 1 हजार 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 हजार 695 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात काल 729आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा नऊ हजार 318 झाला आहे. काल या आजारानं 31 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात कोविड 19 मुळे 400 रुग्ण मरण पावले.
राज्यात आतापर्यंत 1 लाख 29 हजार 931 जणांची कोरोना चाचणी झाल्याची माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं दिली. आजारातून 1 हजार 388 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकंदर 1 लाख 55 हजार170 जणांना होम क्वारंटाईन केलं असून 9 हजार917 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्याच्या विविध भागात मिळून 664 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.
मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 393 नवे रुग्ण काल आढऴले. आतापर्यंत मुंबईत कोविड 19 चे 6 हजार 169 रुग्ण आढळले असून 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातली बाधित रुग्णांची विभागनिहाय आकडेवारी अशी आहे.
ठाणे – 7हजार 223 रुग्ण, 263 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे विभागात रुग्णसंख्या 1 हजार288 असून त्यातले 1 हजार 44 रुग्ण पुणे शहरातले आहेत. या विभागात आतापर्यंत 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर विभागात 48 बाधित रुग्ण असून 2 मृत्यू झाले.
नाशिक- 313 रुग्ण, 27 मृत्यू.
औरंगाबाद- रुग्णसंख्या 108, 6 रुग्णांचा मृत्यू.
लातूरमधे 19 जणांना लागण झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
अकोला विभागात कोविड 19 चे 155 रुग्ण आढळले असून 9 जण दगावले.
नागपूरमधे 139 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
इतर राज्यातले 25 रुग्ण उपचार घेत असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या धान्य बाजारामध्ये आज कोरोना विषाणूची बाधा झालेले चार रूग्ण आढळून आलेत. यापैकी ३ जण नवी मुंबईत तर एक मुंबईत राहणारी व्यक्ती आहे. या भागात एकूण १० जणांना आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं हा भाग प्रतिबंधित केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचा ग्रामीण भाग पुढचे दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत. ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्या इशारा दिला आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रस्त्यावर न येता, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन पोलिस अधीक्षकानी केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज आणखी दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी एक विशेष राखीव पोलिस दलाचा जवान आहे. आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन मे पर्यंत जिल्हातली सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
धुळे इथल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या साक्री इथल्या ८० वर्षीय वृद्धाचं आज पहाटे निधन झालं. त्यांचा कोरोना विषाणू चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला हृदय विकाराचाही त्रास होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आता कोरोनानं शिरकाव केला असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्या पाठोपाठ भुदरगड तालुक्यातल्या आकुर्डी गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे 45 वर्षाच्या पुरुषाचा आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे आरोग्य यंत्रणेच एक पथक अकुर्डी गावाकडे निघालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या 13 झाली आहे.
कराड इथं उपचार घेणाऱ्या 10 महिन्यांच्या बालकासह तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्या सर्वाना इतर प्रक्रिया पार पडल्यानंतर घरी सोडणार आहेत. सातारा जिल्ह्यात आज पर्यंत 8 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सातारा इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना उपचार कक्षात कार्यरत असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. कक्षात काम करणारी महिला कर्मचारी बाधित झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.