नवी दिल्ली : कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊन दरम्यान, रसायने आणि खत मंत्रालयाच्या खत विभागाने, शेतकरी समुदायाला खतांची विक्रमी विक्री केली आहे.
1 ते 22 एप्रिल 2020 या कालावधीत शेतकऱ्यांना 10.63 लाख मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली जी मागील वर्षातील याच कालावधीत झालेल्या 8.02 लाख मेट्रिक टन विक्रीपेक्षा 32 टक्के जास्त आहे.
1 ते 22 एप्रिल 2020 या कालावधीत वितरकांनी 15.77 लाख मेट्रिक टन खताची खरेदी केली जी मागील वर्षातील याच कालावधीत झालेल्या 10.79 लाख मेट्रिक टन खरेदीपेक्षा 46 टक्के जास्त आहे.
कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊन दरम्यान बऱ्याच प्रमाणावरील निर्बंध असतानाही खते, रेल्वे, राज्ये आणि बंदर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशात खतांचे उत्पादन व पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु आहे.
आगामी खरीप हंगामात शेतकर्यांना खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रसायन आणि खत मंत्रालयाने दिलेल्या वचनबद्धतेशी अनुरूप हे काम आहे.
खतांचा प्रश्न नाही. राज्य सरकारकडे खतांचा पुरेसा साठा आहे असे केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले. राज्याच्या कृषिमंत्र्यांशी संपर्क सुरु असून पेरणीच्या वेळेपूर्वी शेतकरी समुदायाला खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास आमचे मंत्रालय वचनबद्ध आहे असे गौडा यांनी सांगितले.
खत प्रकल्पातून आणि बंदरांमधून 17 एप्रिल रोजी, 41 खतांचे रॅक्स हलविण्यात आले. लॉकडाऊन कालावधीत एका दिवसात झालेली खतांची ही सर्वाधिक वाहतूक आहे. एका रॅकने एकावेळी 3000 मे.टन भार उचलला आहे. खत कंपन्यांमध्ये उत्पादन पूर्ण क्षमतेने चालू आहे.
कृषी क्षेत्राला लॉकडाऊनची झळ बसू नये यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत भारत सरकारने देशात खत प्रकल्प सुरु ठेवायला परवानगी दिली आहे.
खत प्रकल्प, रेल्वे स्थानके आणि बंदरांमध्ये खताच्या भरण्या- उतरविण्याचे काम जोरदारपणे सुरू असताना कोविड-19 चा संसर्ग रोखण्याच्या खबरदारीमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. सर्व मजूर आणि इतर कर्मचाऱ्यांना मास्क आणि इतर सर्व प्रतिबंधात्मक उपकरणे पुरविली जातात.