पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचेच प्रयत्न महत्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम आणि गो ग्रीन पुढाकार अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दोन सीएनजी बसेस प्रदान कार्यक्रम विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार ,एमएनजीएलचे कार्यकारी संचालक एस. हल्दर, संचालक संतोष सोनटक्के, दीपक मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पेट्रोल-डिझेलचा अधिकचा वापर आपल्याला परवडणार नाही. प्रदुषण होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता आता शासकीय आणि खाजगी आस्थापनांनी पर्यावरणपूरक साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर सुरु करावा, जेणेकरुन त्यामुळे पेट्रोल, डिझेलची बचत होवून प्रदुषणाची पातळीसुध्दा कमी होईल. त्यामुळे खर्चातदेखील बचत होईल. शासकीय आस्थापनांमधील जुने बल्ब, पंखे, एसी बदलल्यामुळे विजेची व पर्यायाने खर्चातही मोठी बचत झाली आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये बॅटरी ऑपरेटेड कारच्या वापराकरीता प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रदुषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. दोन सीएनजी बसेस विद्यापीठाला देणगीदाखल दिल्याबद्दल त्यांनी एमएनजीएलचे आभार मानले व यासारखे अनुकरण इतर खाजगी कंपन्यांनी करावे असे आवाहन केले.
यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यापीठामार्फत पर्यावरण संवर्धनाकरीता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. विद्यापिठाचा परिसर हरीत करण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, एमएनजीएलचे एम.एस.हल्दर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अभिजीत घोरपडे यांनी तर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.