लॉकडाऊनमुळे अडकलेले ९७७ नागरिक रवाना; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला निरोप

नागपूर : लॉकडाउनमुळे नागपूर विभागात  वेगवेगळ्या निवारागृहात  असलेल्या 977 नागरिकांना घेऊन आज नागपूर ते लखनऊ  विशेष  श्रमिक स्पेशल रेल्वे  गाडी क्रमांक 01902 रात्रौ 7.30 वाजता रवाना झाली. पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी  आपल्या गावी परत जात असल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले.

श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये  विभागातील 977 प्रवाशांमध्ये गडचिरोली 108, चंद्रपूर 289 , भंडारा 133, वर्धा 220, नागपूर 227  प्रवासी यांचा समावेश आहे.

यावेळी रेल्वे मंडळ प्रबंधक सोमेश कुमार, अतिरिक्त डीआर एम मनोज तिवारी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ मंडळ  सुरक्षा अधिकारी  आशुतोष पांडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी, उपविभागीय महसूल अधिकारी नीता पाखले चौधरी आदी अधिकारी  उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग पालन करून चोख व्यवस्था केली होती.

या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही  रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असून  प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची  खात्री करुन घेण्यात येत होती. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत सुके खाद्यपदार्थही देण्यात आले.