नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 42 हजार 533 झाली आहे,कोविड 19 ने मरण पावलेल्यांची संख्या आता 1 हजार 373 झाली आहे. आतापर्यंत 11 हजार 706 जण या आजारातून बरे झाले असून 29 हजार 453 जणांवर उपचार सुरु आहेत.

आज सकाळी 9 वाजेपर्यंत 11 लाख 7 हजार 233 नमुन्यांची चाचणी झाली असल्याचं ICMR ने सांगितलं आहे.

देशभरात कोरोना विषाणूनं काल 67 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 28 गुजरातमधले तर 27 महाराष्ट्रातले आहेत. राज्यात काल नवे 678 रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 हजार 974 एवढी झाली आहे. आतापर्यंत 548 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत काल दिवसभरात 21जणांचा मृत्यू झाला तर 441 नवे बाधित रुग्ण आढळले.

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल २७ नवीन कोरोना विषाणू बाधित आढळून आल्यानं मालेगावमधल्या एकूण रुग्णांची संख्या ३२४ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३६० झाली असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगावमध्ये नवे ७ कोरोनाग्रस्त आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ५२ झाली आहे. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सोलापुरात काम करत असताना त्याला ही लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात आली मात्र त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतून चालत आलेला एक रुग्ण मंडणगड तालुक्यातल्या तिडे गावचा रहिवासी आहे. संगमेश्वर तालुक्यातली एक महिलाही कोरोनाग्रस्त आढळून आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चार रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या दहा इतकी झाली आहे.

सांगली जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.

कर्नाळ गावातला  हा 35 वर्षीय रुग्ण  सातारला गेला असता मुंबईहून आलेल्या नातलगाला भेटला होता. सध्यस्थितीत सांगली जिल्ह्यात एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 34 झाली आहे.

उत्तरप्रदेशमध्य एका ट्रक चालकाला २ मे रोजी वाशीम इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या ट्रक चालकाचा काल मृत्यू झाला. त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं कुकसा फाटा इथल्या ज्या पेट्रोल पम्पावर या चालकानं पेट्रोल भरलं होतं, तो पेट्रोलपंप खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आला आहे. तसंच त्या ट्रकचालकाच्या सहकार्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.