पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारासाठी पिंपरी चिंचवड शहरासह मावळ, खेड, मंचर आदी भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णालयातील रुग्ण सेवेवरील विश्वासाने, शिवाय अतिशय अल्प दरामध्ये उपचार होत असल्याने, दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. अल्पदरातील उत्तम रुग्ण सेवा यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाला वायसीएमएचचा सार्थ अभिमान वाटतो.
तथापि आम्हाला आपल्याला कळवण्यांंस अत्यंत खेद वाटतो की, रुग्णालयातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या गैरवर्तनाने वायसीएमएचचा दर्जा खालावत असल्याचे जाणवत आहे.
मी स्वतः एका रुग्णाला भेटण्यासाठी वायसीएमएचला आलो होतो. ४०१ नंबरच्या महिला वार्डमध्ये गेलो होतो, सेमी स्पेशल रूममध्ये रुग्णाला भेटून जाता-जाता, रूमच्या दरवाजाकडे लक्ष गेले असता, दरवाज्याला आतून कडी कोयण्डा तुटलेला दिसून आला. शिवाय रूममध्ये नवीन गाद्यांचा तसेच बोचक्यांचा ढीग रचून ठेवलेला दिसला. “ही स्पेशल रूम आहे का स्टोअर ?” हेच मला समजले नाही. रुग्णाने सांगितले की, वार्डमधील मनपा कर्मचारी रात्रभर या स्पेशल रूममधील टॉयलचा वापर सार्वजनिक स्वच्छतागृहासारखा सारखा करतात. त्यामुळे रात्रभर झोप लागत नाही. हे ऐकुन मलाच काय कुणालाही धक्का बसेल.
रुग्णाला विश्रांती मिळावी व तो लवकर बरा व्हावा, या उद्देशाने नातेवाईक जनरल वार्डच्या काही पट जादा रक्कम मोजून स्पेशल/सेमी स्पेशल रूम घेतात. पण इथे मात्र मनपा कर्मचाऱ्यांनी सेमी स्पेशल रूम चे अक्षरशः सार्वजनिक टॉयलेट आणि स्टोअर रूम बनवून ठेवले आहे. याबाबत आम्ही ऑफिसमध्ये चौकशी केली असता, दरवाजाला कडी कोयंडे मुद्दाम लावले नाहीत आणि रुगणालयात जागा अपुरी असल्याने गाद्या तेथे ठेवल्या आहेत असे कळाले.
आमचे संस्थेचे सहसचिव मा. उमेश सणस यांनी पुन्हा रुग्णाची भेट घेतली असता “तक्रार का केली?” म्हणत पालिका कर्मचारी यांनी रुग्णाला व नातेवाईकाला दमदाटी केल्याचे समजले. याविरुद्घ लेखी तक्रार करण्यासाठी तक्रार वही मागितली असता “तक्रार वही मिळणार नाही, काय तक्रार असे ती तोंडी सांगा” असे श्रीमती संगीता पाटील यांनी सांगितले. रुग्णांशी उद्धटपणे बोलणे, बेजबाबदार वर्तन करणे, स्पेशल रूममध्ये रुग्ण व नातेवाईक असताना, तेथील स्वच्छतागृहाचा सार्वजनिक स्वच्छतागृहासारखा वापर करून रात्रभर रुग्णाच्या विश्रांतीत बाधा आणणे. शिवाय तक्रार वहीमध्ये तक्रार लिहिण्यास मज्जाव करने याबाबी अत्यंत गंभीर असून रुग्णालयाच्या नावलौकिकास बाधा पोहचवणाऱ्या आहेत.
आम्ही जागृत नागरिक महासंघातर्फे मागणी करतो की, आपण संबंधित कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर अतिशय कडक कारवाई करावी. तसेच रुग्णालयांत येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांशी पालिका कर्मचाऱ्यानी सौजन्याने वागण्यासाठी योग्य ते आदेश द्यावेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक मा.श्री राजेंद्र वाबळे यांंना यासंदर्भात जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन श. यादव यांनी निवेदन दिले.