विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय – मंत्री दिवाकर रावते

सध्या जुन्या पद्धतीच्या पासवरही मिळणार सवलत

मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग इत्यादी) अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाहीत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्ड अभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट कार्ड घेण्यास १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले.

सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग आदी सवलत धारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्डे देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना आज यासंदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या. १ जानेवारी २०२० पासून मात्र सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. सर्व सवलत धारकांनी  (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग इत्यादी) तत्पूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधीत यंत्रणांकडे संपर्क साधून आपापली स्मार्ट कार्डे काढून घ्यावीत, असे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी केले आहे.

राज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरीक हे विविध सवलतीचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळामार्फत सवलत देण्यात येते. या सर्वांना आता स्मार्ट कार्ड घेण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या ज्यांनी स्मार्ट कार्ड काढली आहेत त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार आहे.