नवी दिल्‍ली : जेईई, अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा येत्या १८ ते २३ जुलैदरम्यान, तर नीट, अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा २६ जुलैला होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ही घोषणा केली. ते आज देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा येत्या ऑगस्टमधे होणार असून, त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या प्रलंबित परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यभरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत बातमीदारांना दिली. आज राज्यभरातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होत असून त्यात परीक्षांबाबतचा निर्णय होईल. त्याची माहिती मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिल्यानंतर दोन दिवसांत परीक्षा जाहीर होतील, असं सामंत यांनी सांगितलं.