कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : राज्यातील मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने मका आणि ज्वारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याला २५ हजार मेट्रीक टन मका आणि १५ हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात कृषिमंत्री श्री.भुसे यांनी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेब यांच्याकडे मागणी केली होती. राज्याने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने परवानगी देणारं पत्र नुकतचं राज्याला पाठविले आहे.

केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात ह्या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी धोरणानुसार भारत अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेमार्फत खरेदी केली जाणार आहे. खरेदी केलेले हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ग्राहकांना वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.