बेस्टच्या भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती
मुंबई : मुंबईमध्ये बेस्टचा प्रवास आता फक्त पाच रुपयांत करता येणार आहे. बेस्टच्या भाडे कपातीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबईत किमान पाच रुपये भाड्यात बेस्ट प्रवास करता येणार आहे.
या संदर्भातील अधिसूचना राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत निर्गमित करण्यात आली. बेस्टने दिलेल्या प्रस्तावानुसार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली. त्यानुसार ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली. यामुळे प्रवाशांना आता मुंबईमध्ये स्वस्तात प्रवास करता येणार आहे. बेस्टसाठी आता किमान प्रवास भाडे पाच रुपये असेल. इतर टप्प्यांच्या प्रवास भाड्यातही कपात होणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.