नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे- राज्यपाल

पुणे : लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, राज्य सेवा हक्क आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, देश स्वतंत्र झाला तेव्हा खूप मर्यादित सेवा दिल्या जात होत्या. पुढे जनतेचे कल्याण आणि समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यात भर पडत गेली. सनदी सेवांमध्ये उत्तीर्ण झालेले तरुण उमेदवार ‘पब्लिक सर्व्हिस’ कमिशनमधून आले आहे, अर्थात सेवा हेच शासनाचे मुख्य काम आहे हे लक्षात घ्यायला हवे.

राज्यपाल पुढे म्हणाले, जनतेला कशा प्रकारे दिलासा देता येईल हे पाहणे आपले काम आहे. जनतेच्या समस्यांसाठी अनेक आयोग निर्माण करण्यात आले असून या आयोगांनी चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याचे काम केल्यास जनतेचे कल्याण साधले जाईल. जनतेच्या कल्याणासाठी शासन, प्रशासनामध्ये सुधारणा व संशोधन करावे लागेल. डिजिटायझेशनमध्ये देश अग्रेसर असून ते पुढे न्यायचे आहे, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत राज्यात तसेच पुणे विभागात आलेल्या अर्जांपैकी 95 टक्के अर्जांचा निपटारा झाला ही चांगली बाब आहे. अशा प्रकारे सेवा दिल्यास जनतेच्या विविध समस्यांचे समाधान होऊ शकते. आलेल्या अर्जांवर योग्य प्रकारे निर्णय घेऊन सेवा दिल्या गेल्यास अपीलांची संख्या आपोआप कमी होईल, असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

श्री. क्षत्रिय म्हणाले, सेवा हक्क कायदा नागरिकांना अधिकार, हक्क देणारा आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणारे दाखले, प्रमाणपत्रे, जमीन, पाणी, वीज आदीसंबंधी सेवा सुलभतेने, वेळेत मिळाव्यात यासाठी हा कायदा उपयुक्त ठरला आहे. आयोगाने ऑनलाईन सेवांवर भर दिल्यामुळे जास्तीत जास्त सेवा गतीने देणे शक्य झाले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांच्या संख्येत वाढ झाल्यास नागरिकांना अजून गतीने सेवा मिळतील. नागरिकांच्या सोयीसाठी सेवा केंद्रांची यादी, पत्ते प्रशासनाने जाहीर करावेत, असेही श्री. क्षत्रिय म्हणाले.

प्रास्ताविकात श्री. शिंदे यांनी सेवा हक्क अधिनियमांतर्गत राज्यात, विभागनिहाय तसेच पुणे विभागात नागरिकांना पुरवण्यात आलेल्या सेवांचा संगणकीय सादरीकरणाने आढावा सादर केला. ते म्हणाले, ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ हे आयोगाचे घोषवाक्य असून त्यानुसार काम करत असताना ऑनलाईन सेवा पुरवण्यातून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे.

अधिसूचित करण्यात आलेल्या ५०६ सेवांपैकी आतापर्यंत ३९२ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून भविष्यात सर्वच सेवा ऑनलाईन करणे, आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणे, शासनाच्या सर्व सेवांचे आपले सरकार या एकल संकेतपीठावर एकत्रिकरण करणे आदींसाठी आयोग प्रयत्नशील आहे. महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून वयोवृद्ध तसेच आजारी नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आभारप्रदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, हे कार्यालय पुणे येथे योग्य व मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करुन दिले असून कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम प्रशासनाइतकाच पुणे विभागातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे. या कार्यालयामुळे प्रशासनाच्या कामावर चांगले संनियंत्रण राहील.

यावेळी अत्यंत कमी वेळेत तसेच उत्कृष्ट अंतर्गत सजावट केलेले कार्यालय उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास राज्य लोकसेवा हक्क आयोग, महसूल विभागाचे तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सेवा हक्क कायदा आणि प्रशासनाची कामगिरी
राज्यात हा कायदा अंमलात आल्यापासून प्राप्त १२ कोटी ६६ लाख ७६ हजार प्राप्त अर्जांपैकी ११ कोटी ९७ लाख सेवा मंजूर करुन पुरवण्यात आल्या आहेत. यावर्षी १ एप्रिलपासून राज्यात सर्वाधिक २५ लाख २४ हजार सेवांचे अर्ज पुणे विभागात दाखल झाले असून सर्वाधिक २३ लाख २२ हजार सेवा मंजूर करण्यात आल्या तर २१ लाख ७२ हजार सेवांचे वेळेवर वितरण करण्यात आले आहे.

पुणे विभागाची कामगिरी
पुणे विभागात‘आपले सरकार’पोर्टलवर ३७ विभागांच्या ३९२ सेवांबाबत ऑक्टोबर २०१५ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त २ कोटी ४३ लाख ९८ हजार अर्जापैकी २ कोटी ३१ लाख २ हजार अर्ज (९५ टक्के) निकाली काढण्यात आले आहेत. यावर्षी पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख ९६ हजारपैकी ८ लाख १८ हजार अर्जांचा निपटारा करण्यात आला. विभागात एकूण ९३ टक्के अर्जांसंदर्भातील सेवा वेळेवर देण्यात आल्या आहेत.