नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या मिग-29 विमानाला आज सकाळी (दि.8 मे,2020) पावणे अकरा वाजता अपघात झाला. जालंधरनजिकच्या हवाई तळावरून प्रशिक्षण मोहिमेसाठी या विमानाचे उड्डाण करण्यात आले होते, त्यावेळीच हा अपघात झाला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे, विमान नियंत्रित करणे वैमानिकाला शक्य झाले नाही. वैमानिक अपघातातून बचावल्याचे वृत्त आहे. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.