नवी दिल्ली : कोविड -19 महामारीचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता बळकट करण्यासाठी केंद्र सरकार आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) यांनी नवी दिल्लीत 500दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या “कोविड -19आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्जता प्रकल्प” वर स्वाक्षऱ्या केल्या. बॅंकेकडून भारताला आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आलेली ही  पहिलीच मदत आहे.

ही मदत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणार असून त्यातून बाधित लोक, धोका असलेले लोक, वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचारी आणि सेवा पुरवठादार , वैद्यकीय आणि चाचणी सुविधा,राष्ट्रीय आणि प्राणी आरोग्य संस्था यांच्या गरजा पूर्ण केल्या जातील.

या करारावर केंद्र सरकारच्या वतीने अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे आणि एआयआयबीच्या वतीने महासंचालक (हंगामी)  रजत मिश्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

खरे म्हणाले की, एआयआयबीने वेळेवर मदत पुरवल्यामुळे कोविड -19 मुळे उद्भवलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि देशातील सज्जतेसाठी राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना मदत मिळेल. या महामारीचा तातडीने सामना करण्याची गरज लक्षात घेऊन अर्थ आणि  आरोग्य मंत्रालय तसेच एआयआयबीच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प विक्रमी वेळेत तयार करण्यात आला.

या प्रकल्पामुळे भारतात कोविड 19 चा प्रसाराचा वेग कमी करणे  केंद्र सरकारला शक्य होईल. पीपीई खरेदी ,ऑक्सिजन आणि औषधे वितरण प्रणालीची व्याप्ती वाढवणे, कोविड- 19आणि भविष्यातील अन्य रोगांच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य सार्वजनिक आरोग्य,प्रतिबंध, आणि रुग्ण व्यवस्थापन  यासाठी लवचिक आरोग्य यंत्रणा उभारणे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने काम करणाऱ्या भारतीय आणि इतर जागतिक संस्थांद्वारे कोविड-19 वरील संशोधनाला सहाय्य करणे आणि प्रकल्पाच्या समन्वय तसेच व्यवस्थापनासाठी सार्वजनिक व्यवस्था  बळकट करणे यांसारख्या उपाययोजनांना गती मिळेल.

बाधित लोक, लागण होण्याचा धोका असलेले लोक , वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचारी,वैद्यकीय आणि चाचणी सुविधांमधील सेवा पुरवठादार (सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही) आणि भारताच्या कोव्हीड -१९ लढ्यात सहभागी असलेल्या सार्वजनिक आणि पशु आरोग्य संस्था हे प्रमुख प्रकल्प लाभार्थी असतील.

एआयआयबीचे उपाध्यक्ष (इन्व्हेस्टमेंट ऑपरेशन्स) डी.जे. पंडियन म्हणाले की कोविड -19 रूग्णांवर प्रभावीपणे उपचार करणारी आणि त्याचा प्रसार रोखू शकेल अशी लवचिक आरोग्य यंत्रणा तयार करण्याला प्राधान्य आहे. या निधीतून ही गरज पूर्ण होईल आणि भविष्यातील रोगाच्या  प्रादुर्भावाचे  प्रभावीपणे व्यवस्थापन  करण्याची भारताची क्षमता मजबूत होईल.

ते पुढे म्हणाले की, या अभूतपूर्व जागतिक आव्हानाचा सामना करताना  एआयआयबी आपली भूमिका पार पाडेल आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांबरोबर काम करेल जेणेकरून भारताला आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था लवकरात लवकर सावरण्यासाठी त्वरित आर्थिक मदत पुरवता येईल.

या प्रकल्पाला जागतिक बँक आणि एआयआयबीकडून 1.5अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य असून  त्यातील 1 अब्ज डॉलर्स जागतिक बँक तर 500 दशलक्ष डॉलर्स एआयआयबी पुरवणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्यामार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे.