नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटूंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. कामगारांना राज्यात परत आणण्याची संपूर्ण व्यवस्था केली जात असून, कुणीही पायी चालत येऊ नये, असं आवाहनही चौहान यांनी केलं आहे.
मध्य प्रदेश सरकारमधल्या मंत्री मीना सिंह यांनी काल औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथं जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर रात्री औरंगाबादहून मध्यप्रदेशात गेलेल्या रेल्वेने सोळा मृतदेह पाठवण्यात आले.
या अपघात प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त रामकृपाल यांना सविस्तर तपासाचे आदेश रेल्वे मंडळानं दिले आहेत. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीला आपला अहवाल तीन दिवसात द्यायला सांगितलं आहे.