पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणार – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढणाऱ्या पोलीस दलातील योद्ध्यांसाठी गृह विभागामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी गृह विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यातील पोलीस दल कोरोना विरुद्धच्या या युद्धात २४ तास कार्यरत आहे. कार्यक्षमतेच्या दुपटीने पोलिसांना काम करावे लागत आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या आरोग्यावर तसेच कुटुंबियाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. राज्यातील जवळपास नऊशे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या सर्वांच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाने पोलिसांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत. यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.
Covid-19 हेल्पलाईन
राज्यातील पोलिसांना विविध कोविड रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत, याकरिता एक कोविड हेल्पलाइन पूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या या हेल्पलाईनद्वारे तज्ज्ञांकडून समुपदेशन व मार्गदर्शन केले जाते. अशाच प्रकारचे कक्ष मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत देखील मुंबई पोलिसांसाठी तयार केले आहेत. दहा अपर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात दहा कोविड कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याद्वारे पोलिसांसाठी राखीव असलेल्या रुग्णालयातील रिक्त बेडची संख्या, तसेच इतर अनुषंगिक माहितीही दिली जाते.
साधन सामुग्री
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आतापर्यंत जवळपास ७.५ लाख विविध प्रकारचे मास्क १५ हजार लिटर सॅनिटायझर, २२ हजार फेस शिल्ड, ४४ हॅन्ड ग्लोव्हज्, ड्रोन कॅमेरा अशा आवश्यक असलेल्या जवळपास चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलिसांसाठी देखील जवळपास २.५ कोटी रुपयांच्या अशाच आवश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत. विविध वित्तीय संस्था, कंपन्या सामाजिक संस्था, यांच्याकडूनही देणगी स्वरूपात अशा वस्तू मिळाल्या आहेत. याखेरीज बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी अल्पोपहार व मिनरल वॉटरची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.
खरेदीचे अधिकार
पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, याकरिता कोविड 19 प्रतिबंधात्मक आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदी करीता पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. असे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तालयालाही देण्यात आले आहेत. जवळपास १३७ कोटी रुपयांचा निधी, पोलीस कल्याण निधीतून मंजूर करण्यात आला. तसेच प्रत्येक अपर आयुक्तालय क्षेत्रासाठी १० कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आवश्यकता भासल्यास यातून सर्व खरेदी करण्यात येईल.
प्रतिबंधात्मक औषधे
पोलीस बांधवांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, त्यांची प्रतिबंधात्मक शक्ती वाढावी तसेच शारीरिक क्षमता टिकून राहावी यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप देखील करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने होमिओपॅथी औषधी. तसेच vitamin C, D, Multivitamin या गोळ्यांचे वाटप घटक स्तरावर करण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातही अशाच प्रकारच्या १० कोटी रुपयांच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात येत आहे.
कोविड अग्रीम
कोविड बाधित पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून एक लाख रुपचांचा अग्रीम देण्यात येत आहे. आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा अग्रीम मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातही अशाच प्रकारचे अग्रीम वाटप करण्यात आले आहे.
शासकीय अनुदान
कोविड संदर्भात साधनसामुग्री घेण्याकरिता राज्यात पोलीस विभागाला ९ कोटी रुपयांचे अनुदान कार्यालयीन खर्चापोटी देण्यात आले. तर मुंबई पोलीस आयुक्तालयातही आतापर्यंत १ कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
रोकड विरहित उपचार
महाराष्ट्र पोलीस कुटुंब योजनेअंतर्गत कोविड 19 उपचार राज्यातील नामांकित रूग्णालयात करण्यात येत आहेत. कोविड बाधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बाबत घटक प्रमुखांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडेही लक्ष आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाशी देखील संवाद साधला जात आहे. कोविड 19 कक्षाच्या माध्यमातून राज्यात व मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलिसांची काळजी घेतली जाते.
कर्तव्यात सूट
५० वर्षाच्या वरील पोलीस कर्मचाऱ्यांना जनतेशी संपर्क येईल अशी कोणतीही कामे दिली जात नाहीत. तसेच ५५ वर्षावरील पोलिसांना रजा घेण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे.
वारसांना नुकसान भरपाई
कर्तव्य बजावत असताना कोविड बाधा होऊन दुर्दैवाने पोलीस कर्मचारी मृत्यूपावल्यास त्यांच्या कुटुंबाप्रती विभागास सहानुभूती आहेच. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत आतापर्यंत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस फाऊंडेशन मार्फत १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. राज्यातही हुतात्मा निधी मार्फत १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान कुटुंबियांना देण्यात येते.
प्रशंसापात्र रक्कम
मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत पोलिसांना कर्तव्यावर असताना कोरोना बाधा झाली, तर त्यास १० हजार रुपये प्रशंसापात्र रक्कम देण्यात येत आहे. आयुक्तालयामार्फत आतापर्यंत २५ लाख ८० हजार रुपये थेट पोलिसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
ताप तपासणी केंद्र (Fever checking center)
कोविड संदर्भात काही लक्षणे दिसल्यास अथवा शंका आल्यास मुंबई मध्ये महानगरपालिकेच्या सहकाऱ्याने दोन ठिकाणी ताप तपासणी केंद्र देखील सुरू केली आहेत. या ठिकाणी पोलीस व त्यांचे कुटुंब येऊन तपासणी करू शकतात. आतापर्यंत ११०८ व्यक्तींची तपासणी या केंद्रात झाली आहे.
अशाप्रकारे विविध सुविधा सोयी देऊन पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न गृह विभागामार्फत, शासनामार्फत होत आहे. नागरिकांनीदेखील पोलिसांना योग्य ते सहकार्य करून कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.