भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘सचेत’ आणि दोन आंतररोधी बोटींचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जलावतरण
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गोवा येथे भारतीय तटरक्षक दलाचे (आयसीजीएस) सचेत जहाज आणि दोन आंतररोधी नौका (आयबी) C-450 आणि C-451 यांचे जलावतरण केले. आयसीजीएस सचेत हे पाच समुद्र गस्त जहाजांच्या (ओपीव्ही) शृंखलेतील पहिले जहाज आहे. ते गोवा शिपयार्डने (जीएसएल) संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि निर्मित केले असून अत्याधुनिक आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहे.
आयजीजी आणि जीएसएलचे डिजिटल माध्यमातून जलावतरण करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले, “ही जहाजे नौदलाच्या सेवेत रुजू होणे हा भारताच्या किनाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच कोविड-19 सारखे आव्हान समोर असताना देखील या जहाजांची निर्मिती म्हणजे देशाची सुरक्षा आणि संरक्षणासाठी आमची वचनबद्धता आणि दृढनिश्चयाचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. ‘आमचे सागरी रक्षक’ आयसीजी आणि भारतीय जहाजबांधणी उद्योगाचे वाढते सामर्थ्य हे देशासाठी अभिमानाची बाब आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन ‘सागर’ (या क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा आणि प्रगती) बद्दल संरक्षण मंत्री म्हणाले की, “महासागर हे केवळ आपल्या देशाचेच नव्हे तर जागतिक समृद्धीची जीवनवाहिनी आहे.” सुरक्षित, संरक्षित आणि स्वच्छ समुद्र आपल्या राष्ट्र निर्मितीसाठी आर्थिक संधी प्रदान करतात. भारत ही उदयोन्मुख सागरी सत्ता आहे आणि आपली समृद्धी देखील मोठ्याप्रमाणात समुद्रावर अवलंबून आहे. आपण एक जबाबदार सागरी सत्ता असल्याने समुद्र हे सरकारचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.
समुद्र किनाऱ्यांच्या संरक्षणात आयसीजीच्या भूमिकेचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले की, “जगातील चौथ्या क्रमांकाचे तटरक्षक दल म्हणून त्याने एक विश्वासार्ह दल म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. हे केवळ आपल्या समुद्र किनाऱ्यांचे आणि किनारपट्टीवरील नागरिकांचे संरक्षण करत नाहीत तर विशेष आर्थिक क्षेत्रातील (ईईझेड) आर्थिक उपक्रम आणि सागरी वातावरणाचे देखील संरक्षण करतात.”
संरक्षण मंत्री म्हणाले की, समुद्र हा, देशविरोधी घटकांनी पाठबळ दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या धोक्याचे माध्यम बनू शकतो. म्हणूनच सर्व भागधारकांमध्ये सहयोगात्मक आणि सहकारी दृष्टिकोन विकसित करणे अत्यंत महत्वाचे आहे. तटरक्षक दलात सामील झालेली जहाजे दलाची शक्ती वृद्धिंगत करतील आणि सागरी दहशतवाद, मादक पदार्थांची तस्करी, तस्करी, सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि संकटात सापडलेल्या नाविकांचा शोध आणि बचाव यासंबंधित आव्हानांचा सामना करण्यास मदत करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजनाथ सिंह यांनी गोवा शिपयार्ड आणि एल अँड टी शिपयार्ड, हजीरा यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले की त्यांनी सध्याच्या परिस्थितीत देखील जहाजांची उभारणी व देखरेख चालू ठेवली आहे. ते म्हणाले, “यातून व्यावसायिकता देखील दिसून येते. भारतीय शिपयार्ड ‘मेक इन इंडिया’ आणि आमच्या पंतप्रधानांनी नुकतेच प्रोत्साहन दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत अभियानाच्या’ दृष्टीने महत्वपूर्ण योगदान देत आहे हे खूप उल्लेखनीय आहे.”
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कृष्णा स्वामी नटराजन म्हणाले की, जलावतरणाच्या या कार्यक्रमाने हे सिद्ध केले की, कोविड-19 मुळे उद्भवणाऱ्या संकटांवर मात करत आयसीजीने आपले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. ते म्हणाले की आयसीजी जहाजांच्या ताफ्यात नवीन जहाजे समाविष्ट झाल्यामुळे आयसीजीचा समुद्रावर कायम सतर्क राहण्यास आणि कोविड-19 च्या विरोधातील देशव्यापी लढाईत हातभार लागेल.
105 मीटर लांबीचे ‘सचेत’ जहाज अंदाजे 2,350 टन विस्थापन क्षमतेचे असून याला 6000 नौटिकल मैल क्षमतेसह 26 समुद्री मैलाची कमाल गती प्राप्त करण्यासाठी डिझाईन केलेली दोन 9100 केडब्ल्यू डीझेल इंजिने बसविण्यात आली आहेत. अत्याधुनिक उपकरणे आणि प्रणालींसह एकवटलेली प्रवेशयोग्यता, तिला कमांड प्लॅटफॉर्मची भूमिका पार पाडण्याची क्षमता आणि आयसीजी सनद पूर्ण करण्याची कार्यक्षमता प्रदान करते. हे जहाज दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टर आणि चार वेगवान नौका आणि स्विफ्ट बोर्डिंग आणि शोध आणि बचाव कार्यासाठी एक इंफ्लेटेबल बोट वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे जहाज समुद्रातील तेल गळतीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काही प्रदूषण प्रतिसाद उपकरणे नेण्यास सक्षम आहे.
‘सचेत’ म्हणजे दक्ष म्हणजे राष्ट्राच्या सागरी हिताची सेवा करण्यासाठी व संरक्षणासाठी आयसीजीची नेहमी जागरूक राहण्याची इच्छाशक्ती आणि वचनबद्धता. आयसीजीएस सचेत चे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल राजेश मित्तल हे कमांडर आहेत आणि जहाजावर 11 अधिकारी आणि 110 कर्मचारी कार्यरत आहेत. भारतीय सागरी इतिहासात पहिल्यांदाच कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत एका जहाजाचे डिजिटल माध्यमातून जलावतरण करण्यात आले.
आयबीएस सी-450 आणि सी-451 या नौका स्वदेशी डिझाईनने निर्मित आणि लार्सन व टुब्रो शिपयार्ड हजीरा यांनी निर्माण केलेले अद्ययावत नेव्हिगेशन आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहेत. 30 मीटर लांबीच्या या दोन नौका 45 नॉट्सपेक्षा जास्त वेग मिळविण्यास सक्षम आहेत आणि वेगवान हस्तक्षेप, जवळच्या किनाऱ्यांवर गस्त घालणे आणि कमी जोखमीच्या सागरी कार्यवाहीसाठी डिझाइन केलेल्या आहेत. आयबीची जलद प्रतिसाद क्षमता ही कोणत्याही उदयोन्मुख समुद्री परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी एक आदर्श मंच आहे. सहाय्यक कमांडंट गौरव कुमार गोला आणि सहाय्यक कमांडंट अकिन झुत्शी हे या जहाजाचे अधिकारी आहेत.
तटरक्षक दल स्वदेशी बनावटीची जहाजे आणि इतर सामग्री यांचा समावेश करण्यात अग्रेसर राहिले आहे. आयबी कडे अधिकाधिक 70 टक्के स्वदेशी सामग्रीचा समावेश असल्यामुळे हे जहाज निर्मिती उद्योगाला पोषक आहे.
तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर ही जहाजे देशाच्या समुद्री हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाच्या कर्तव्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष आर्थिक क्षेत्रावर (ईएसझेड) देखरेख ठेवणे, किनारपट्टीची सुरक्षा आणि इतर कर्तव्यांसाठी मोठ्या प्रमाणात तैनात केली जातील. ही जहाजे सेवेत रुजू झाल्यानंतर आता आयसीजीच्या ताफ्यात 150 जहाज आणि नौका आणि 62 विमाने आहेत. शिवाय, विविध भारतीय शिपयार्ड्समध्ये 40 जहाजांचे बांधकाम विविध टप्प्यात सुरु आहे आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगलुरू येथे प्रगत हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन चालू आहे. यामुळे आयसीजीच्या देखरेखीच्या क्षमतेस कायमस्वरुपी सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचे सामर्थ्य प्राप्त होईल.
आयसीजीने समुद्रातून सुमारे 400 लोकांचे जीवन आणि नागरी अधिकाऱ्यांना मदतीचा एक भाग म्हणून आणखी 4,500 लोकांचे जीव आजवर वाचवले आहेत. आयसीजीने केवळ भारतीय सागरी सिमांमधील संकटांचेच निराकरण केले नाही तर मित्र राष्ट्रांसोबत असलेल्या द्विपक्षीय सहकार्य कराराच्या तरतुदी नुसार हिंद महासागर प्रदेशात देखील अमलीपदार्थ पदार्थांची तस्करी पकडून ते जप्त केले आहेत. आयसीजी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अचूक माहिती सामायिक करणे, जवळचे समन्वय यांचे महत्त्वाचे स्थान आहे.
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, सचिव (संरक्षण उत्पादन) राज कुमार, सचिव (संरक्षण वित्त) गार्गी कौल आणि संरक्षण मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे उपस्थित होते, तर रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमांडर भारत भूषण नागपाल (निवृत्त) गोव्यातील कार्यक्रमात उपस्थित होते.