नवी दिल्ली : सरकार चालवत असलेल्या श्रमिक विशेष गाड्या आणि बसद्वारे अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी जलदगतीने सुविधा उपलब्ध करुन द्यावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मे 2020 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले होते.
स्थलांतरित कामगार रस्त्यावर आणि रेल्वे रुळांवर प्रवास करत असल्याच्या परिस्थितीबाबत या पत्रात लिहिण्यात आले होते. कामगार अशा प्रकारे प्रवास करताना आढळले तर त्यांचे समुपदेशन करावे, जवळच्या निवारागृहात त्यांची सोय करावी आणि ‘श्रमिक’ विशेष गाड्या किंवा बसने प्रवास करण्याची त्यांची सोय होईपर्यंत त्यांना भोजन, पाणी इत्यादी सुविधा पुरवाव्यात, असा सल्ला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला होता.
मात्र, देशातील विविध भागातून स्थलांतरित कामगार रस्ते, रेल्वे रुळांवर आणि ट्रकमधून प्रवास करत असल्याच्या घटना अजूनही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पुन्हा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. स्थलांतरित कामगार चालत घरी जाऊ नयेत याची काळजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी घ्यावी असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालय दररोज 100 पेक्षा जास्त ‘श्रमिक’ विशेष गाड्या चालवत आहे आणि आवश्यकता भासल्यास जादा गाड्यांची व्यवस्था करण्यास तयार आहे. लोकांना याबाबत अवगत करणे आवश्यक आहे. तसेच त्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ते सरकारकडून खास चालवल्या जाणाऱ्या गाड्या/बस याद्वारे प्रवास करू शकतात, त्यांनी पायी प्रवास करू नये याबाबत राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी त्यांचे समुपदेशन करावे. असे गृह मंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे.