नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत सध्या सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात केंद्र सरकारनं बदल केले असून त्यानुसार ठिबक आणि तुषार संचासाठीच्या खर्च मर्यादेतही सुमारे दहा ते चौदा टक्के वाढ केली आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ होणार आहे. सिंचनासाठीची खर्च मर्यादा यापूर्वी २०१६ मध्ये निश्चित करण्यात आली होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत ही मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी तसंच ठिबक सिंचन उत्पादकांकडूनही केली जात होती. नव्या बदलामुळं शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रति हेक्टर सुमारे पंधरा हजार रुपये जादा अनुदान मिळणार आहे.