मुंबई (वृत्तसंस्था) : रुढी-परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रबोधन नियतकालिकातले केशव सिताराम ठाकरे यांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या त्रिखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. नेता म्हणून लोकशाहीत मत महत्वाचे आहे, पण लोकांमध्ये काम करीत असतांना हिंमतसुद्धा आवश्यक आहे. प्रबोधनकारांनी ती दाखवली. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतींच्या विरोधात प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. ते नास्तिक नव्हते, मात्र धर्माच्या नावावर चालणारे ढोंग त्यांना आवडत नव्हते. देश हाच धर्म अशी शिकवण त्यांनी दिली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘प्रबोधन’ या नियतकालिकाने संपूर्ण महाराष्ट्रात समाजसुधारणेचं नवे वारे निर्माण केले आणि महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली. नव्या विचाराची पिढी घडवण्यात प्रबोधनचा मोलाचा वाटा होता, त्यांचे विचार घराघरात पोहचावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे ग्रंथ पोहचवावेत अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. या ग्रंथांचे सर्वत्र स्वागत होईल असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. प्रबोधनच्या शताब्दीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक आणि विश्वंभर चौधरी यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. तसंच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या balasahebthakaray.in या संकेतस्थळाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.