बुलढाणा व सातारा मध्ये नवीन गुन्हे

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३९१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३९१ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १७ गुन्हे अदखलपात्र (N.C) आहेत.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६८ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok व्हिडिओ शेअर प्रकरणी १६ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१० आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या १४ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट टाकली होती त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

सातारा

सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या ११ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती व अफवा पसरविणारे मेसेजेस विविध ग्रुपवर व्हाट्सॲपद्वारे शेअर केले होते, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

सावधानता बाळगावी

सध्या लॉकडाऊनच्या काळात, घरातील सर्व व्यक्ती इंटरनेटचा वापर करत असल्यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे . बरेच नागरिक ऑनलाईन web series, नाटक, चित्रपट बघायला व गाणी ऐकायला इंटरनेटचा वापर करत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, आपण सर्व webseries, नाटक, चित्रपट हे अधिकृत वेबसाईटवरच बघावे, तसेच गाणी पण अधिकृत वेबसाईटवरूनच डाऊनलोड करा. एखाद्या चुकीच्या व फेक वेबसाईट लिंकवर फुकट web series, नाटक, चित्रपट बघण्यासाठी क्लिक केल्यास तुमच्या कॉम्प्युटर अथवा मोबाइलवर एखादे malware डाउनलोड होऊन तुमचे devices हॅक होऊ शकतात. तसेच webseries, नाटक, चित्रपट, गाणी असणाऱ्या अशा वेबसाईटचे subscription भरण्याआधी ती वेबसाईट अधिकृत आहे का याची खात्री करून घ्या. जर अशी वेबसाईट फेक असल्यास तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डचे डिटेल्स या फेक वेबसाईटच्याद्वारे सायबर भामट्यांच्या हाती लागू शकतात.

लॉकडाऊनबाबत फक्त राज्य व केंद्र सरकार अधिकृतरित्या जी माहिती व नियमावली वेळोवेळी प्रसिद्ध करतील त्यावरच विश्वास ठेवा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन ​​विशेष पोलीस महानिरीक्षक,​ ​महाराष्ट्र सायबर, मुंबई यांनी केले आहे.