मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊन ४ मध्ये पालन करायच्या नव्या दिशानिर्देशांची घोषणा आज केली.त्यानुसार राज्यांची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. यावेळी महत्त्वाचा बदल म्हणजे संपूर्ण जिल्हा नव्हे तर केवळ पालिकाक्षेत्र रेड झोन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव,नाशिक, धुळे, जळगाव,अकोला आणि अमरावती महापालिका क्षेत्रांचा समावेश रेड झोनमध्येकरण्यात आलेला आहे.
या सर्व क्षेत्रात केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्र आखली जाणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यात एखादी कॉलनी, झोपडपट्टी, मोहल्ला, बिल्डींग, सोसायटी,गल्ली, वॉर्ड, पोलिसस्टेशनचा भाग, गाव किंवा काही गावं प्रतिबंधित क्षेत्रम्हणून घोषित करता येतील. यापेक्षा मोठा भाग उदा. संपूर्ण महापालिका क्षेत्र किंवासंपूर्ण तालुका प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यापूर्वी मुख्य सचिवांचा सल्ला घ्यावा लागेल.
प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. वैद्यकीय कारणं आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा याशिवाय या क्षेत्रात कुणाला प्रवेश करता येणार नाही किंवा येथून बाहेर येता येणार नाही. राज्यभरात विमान, मेट्रो सुरू होणार नाहीत. शाळा, महाविद्यालय, इतर शैक्षणिक संस्था, चित्रपट गृह, मॉल, व्यायामशाळा,तरण तलाव, बार, ऑडिटोरियम,विविध हॉल, मंदीर, मशीद,चर्च आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहतील. राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्रीडाविषयक,मनोरंजनात्मक, शैक्षणिक किंवा इतर कुठल्याही कारणासाठी लोकांना एकत्र जमवता येणार नाही.घरपोच खाद्य पुरवठा करण्यासाठी रेस्टॉरंटला प्रतिबंधित क्षेत्र वगळता राज्यभर परवानगीदेण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान घराबाहेर पडता येणार नाही.
६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, मधुमेह,हृदयरोग, दमा यासारखे आजार असलेल्या व्यक्ती,गर्भवती आणि १० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी जीवनावश्यक आणि वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला राज्य सरकारने दिला आहे. रेडझोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं पूर्वीप्रमाणे उघडी राहतील. इतर दुकानं महापालिकांच्या परवानगीनं उघडता येईल. मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी असेल तर ती उघडी राहू शकतील किंवा ती घरपोच वितरीत करता येईल. रेडझोनमध्ये केश कर्तनालय, स्पा वगैरे सुरू करायला परवानगी देण्यात आली नसली तरी इतरत्र ती सुरू होऊ शकतील. ई-कॉमर्ससेवा पुरवठादार आता जीवनावश्यक आणि इतर वस्तूंचेही वितरण करू शकतील. रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवेतल्या उद्योगांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय मजुरांची वाहतूक गरजेची नसेल तर सर्व बांधकामंही सुरू होऊ शकतील. मात्र टॅक्सी, रिक्षा, कॅब आणि अॅप आधारित सेवा रेड झोनमध्ये बंदच राहतील.
अत्यावश्यक कामासाठी चारचाकीमध्ये चालक आणि इतर दोन व्यक्ती तर दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी आहे. रेडझोनमध्ये अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी गरजेप्रमाणे कामावर येऊ शकतील. मात्र खासगी कार्यालयं पूर्णपणे बंद राहतील. रेडझोनमध्ये आरटीओ, उपनिबंधक कार्यालय, गैरशैक्षणिक कामासाठी विद्यापीठ, महाविद्यालय सुरू होऊ शकेल.उत्तर पत्रिका तपासणी, निकाल जाहीर करणे, ऑनलाइन अभ्यासक्रम निर्मिती ५ टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल त्यानुसार सुरू राहतील.
खासगी कार्यालयं मात्र रेड झोनमध्ये पूर्णपणे बंदराहतील. रेडझोन वगळता इतर ठिकाणी सर्व प्रकारची सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकतील. याठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही परवानगी देण्यात आली आहे.याठिकाणी दुचाकीवर एक व्यक्ती, रिक्षा आणि चारचाकीमध्ये चालक आणि इतर २ व्यक्ती प्रवास करू शकतील. जिल्हांतर्गत बस वाहतूक ५० टक्के प्रवासी क्षमतेसह सुरू होऊ शकेल. आंतर जिल्हा वाहतुकीसाठी स्वतंत्र निर्देश नंतर दिले जाणार आहेत. रेडझोन वगळता इतरत्र मॉल वगळता सर्व प्रकारची दुकानं ९ ते ५ दरम्यान उघडता येतील.मात्र याठिकाणी गर्दी झाल्याचे किंवा सुरक्षित अंतराच्या नियमाचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं तर ही दुकानं बंद करण्याचे आदेश देण्याची मुभा स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.
लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त ५० लोकांना बोलविण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावेळीही सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक असेल. याशिवाय सर्वत्र घराबाहेर पडताना चेहरा झाकून घेणं किंवा मास्क लावणं गरजेचं असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान,तंबाखू खाण्यावरही प्रतिबंध आहेत. उघडण्यास परवानगी असलेल्या दुकानातही ग्राहकांमध्ये किमान ६ फुटांचं अंतर ठेवावं लागेल आणि एकावेळी ५ पेक्षा जास्त लोकांना दुकानात प्रवेश करता येणार नाही.