AppleMark

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विश्वास; सुमारे 8 हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा घेतला आढावा

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी इंधन कंपन्यांकडून उभारल्या जात असलेल्या सुमारे 8 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पाईपलाईन प्रकल्पांचा आढावा घेतला. आत्मनिर्भर भारत अभियानाचा पुरस्कार करत, या प्रकल्पांची उभारणी संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीने केली जावी असे आवाहन प्रधान यांनी केले.

गेल कंपनीने येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 1 लाख टन पोलाद खरेदीसाठी 1000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे, त्यामध्ये 800 किमी लांबीच्या पाईपलाईनची निविदा देशातील कंपन्यांकडून मागविण्यात आली आहे. मेक इन इंडिया मोहिमेला चालना देऊन स्वावलंबी भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी या आर्थिक वर्षात हे प्रमाण दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय नैसर्गिक वायू वाहिनी कॉरीडॉर द्वारे देशाचा पूर्व भाग पश्चिम भागाला जोडण्यासाठी प्रधान मंत्री उर्जा गंगा अभियानाअंतर्गत सुरु करण्यात आलेला जगदीशपूर – हल्दिया, बोकारो – धर्मा पाईपलाईन प्रकल्प टाळेबंदी उठविल्यानंतर पुन्हा जोमाने कार्यरत झाला आहे.

इंडियन ऑईल कंपनी दक्षिण भारतात 6025 कोटी रुपये गुंतवणूक असलेला 1450 किमी लांबीचा नैसर्गिक वायू वाहक पाईपलाईन प्रकल्प उभारत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाचा आदर्श ठेवून कंपनीने देशात उत्पादन झालेले 2060 कोटी रुपयांचे 1.65 लाख टन पोलादी पाईप या प्रकल्पात वापरले आहेत.

देशाच्या ईशान्य भागातील ८ राज्यांना नैसर्गिक वायूचा अखंडित पुरवठा करून त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लावणे आणि भारतातील नैसर्गिक वायू इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी इंद्रधनुष गॅस ग्रीड कंपनी त्या भागात वायू वाहक पाईपलाईनचे जाळे उभारत आहे. या 950 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पात 550 किमी पाईप देशातील उत्पादकांकडून खरेदी करण्यात आले आहेत आणि चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत हे प्रमाण दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे.