नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात ६ हजार ६५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. गेल्या २४ तासांत १३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ३ हजार ७२० जणांचा बळी कोविड १९ च्या महामारीत गेला आहे.
सध्या ६९ हजार ५९७ रुग्णांवर उपचार सुरु असून ५१ हजार ७८३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ३९ शतांश झालं आहे. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
राज्यात काल २ हजार ९४० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. एका दिवसात एवढे रूग्ण प्रथमच आढळून आले आहेत. यामुळे राज्यातली एकूण रूग्णांची संख्या ४४ हजार ५८२ एवढी झाली आहे. काल दिवसभरात ६३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात या आजारानं मृत्यू पावलेल्यांची संख्या एक हजार ५१७एवढी झाली आहे.