विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा

राज्य शासनाच्या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज केले. रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्ये बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला, या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. दिलीप कदम आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार खाजगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिला.

पुणे शहरात विविध अंदाजानुसार कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून नियोजन करावे लागणार असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्णालयाने शासनाकडे अद्ययावत व वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करावी, जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल. खाजगी रुग्णालय व प्रशासन मिळून पुणेकरांसाठी एकत्रित काम करूया व पुण्याला कोरोनामुक्त करूया, प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरबाबतही डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करू व यातून आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिका आयुक्त श्री गायकवाड यांनी रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळल्यास अडचण निर्माण होणार नाही व प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होणार आहे.

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच कोरोनाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृतीसाठी डॉक्टरांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी पुण्यातील खाजगी रुग्णालय व्यवस्थापाचे प्रमुख, डॉक्टर तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.